जसलोक हॉस्पिटलच्या १४व्या मजल्यावर, समुद्राकडे तोंड असलेल्या या खोलीत बसले आहे. समोर अथांग समुद्र दिसतोय, पण मनात मात्र असंख्य विचारांची गर्दी आहे. काळजी आहे, भीती आहे, आशा आहे आणि मनाच्या एका कोपऱ्यात एक प्रश्न सतत डोकावतोय... मी जे केलं ते खरंच योग्य केलं का? आईची थोड्याच वेळात हृदयाच्या व्हॉल्व्हची शस्त्रक्रिया होणार आहे. पण आईला विचाराल तर तिच्या मते तिला काहीच झालेलं नाही! “मी ठीक आहे गं. थोडा दम लागतो एवढंच. वय झालं की एवढं होतंच.” पण किरणला आणि मला जाणवत होतं की हे केवळ वाढत्या वयामुळे नाही. ही तीच आई आहे जी माझ्यापेक्षाही कितीतरी फिट होती. डोंगर सहज चढायची. रोज कमीत कमी दहा किलोमीटर चालायची आणि तरीही तिला थकवा जाणवायचा नाही. पण हळूहळू ती बदलत चालली होती. थोडंसं चाललं तरी दम लागायचा. पटकन थकायला व्हायचं. साधा स्वतःसाठी चहा करायला उभं राहणंसुद्धा तिला कष्टाचं वाटू लागलं होतं. मागच्या वेळी मुंबईला आले तेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. म्हटलं, सगळ्या तपासण्या करून घेऊया. पण विश्वास बसणार नाही... बाई चक्क हॉस्पिटलमधून पळून गेल्या! सत्तरी पार केलेली आई अशी हॉस्पिटलमधून...
Experiences penned in poetic form...